करंदीतील चोरट्यांच्या थरारातील दुसऱ्याही युवकाचा मृत्यू

क्राईम

संशयित चोरट्यांचा गावातील युवकांनी केला होता कार मधून पाठलाग

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे दोन दिवसांपूर्वी रात्री दीड वाजता गावात संशयित चोरटे दिसलेले असताना युवकांनी त्यांचा पाठलाग केला असताना झालेल्या अपघातात त्याचवेळी एका युवकाचा मृत्यू होऊन दोघे गंभीर जखमी झालेले असताना त्या जखमी पैकी अजून एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे (दि. १८) डिसेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन संशयित युवक दुचाकीवरून जाताना दिसल्याने काही युवकांनी त्यांचा एम एच १२ यु सि ४३५८ या कार मधून पाठलाग केला असताना काही अंतर गेल्यानंतर सदर युवकांचा अपघात होऊन तिघे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात सोनू फिरोज गुडदावत, राजपाल कांतीलाल शेरावत व मंगल बजरंग नानावत हे तिघे गंभीर होत राजपाल कांतीलाल शेरावत रा. शेरेवस्ती धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे या युवकाचा मृत्यू झाला होता तर सोनू फिरोज गुडदावत रा. भुजबळ वस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व मंगल बजरंग नानावत रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे हे दोघे गंभीर जखमी झालेले असताना त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असता या घटनेतील राजपाल शेरावत व मंगल नानावत हे दोघे खुनासह अन्य गंभीर गुन्ह्यांतील पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समोर आले होते.

मात्र उपचार सुरु असताना मंगल बजरंग नानावत रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे या गुन्हेगाराचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे, या घटनेबाबत करंदीच्या पोलीस पाटील वंदना महेश साबळे (वय ४२) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या खबर वरुन पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहे.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक रोहिदास पारखे, पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत येथील सोनू फिरोज गुडदावत, राजपाल कांतीलाल शेरावत व मंगल बजरंग नानावत या तिघांना येथील मिलिंद ढोकले, वैभव ढोकले, गौरव ढोकले, किरण ढोकले, आकाश ढोकले, गोरक्ष ढोकले, शंकर जांभळकर यांच्या मदतीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.

मात्र यापैकी राजपाल कांतीलाल शेरावत रा. शेरेवस्ती धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे या युवकाचा मृत्यू झाला तर सोनू फिरोज गुडदावत रा. भुजबळ वस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे व मंगल बजरंग नानावत रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

गुन्हेगारांचा गुन्हेगारीतूनच झाला अंत…

करंदी (ता. शिरुर) येथील घडलेल्या घटनेतील राजपाल शेरावत व मंगल नानावत हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत असताना ते पोलिसांना गुंगारा देत होते, परंतु गुन्हे करण्यासाठी बाहेर पडलेले असतानाच त्यांचा गुन्हेगारीतून अखेर अंत झाला आहे.