crime

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणातून व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील अण्णापूर ग्रामपंचायत कार्यालय जवळ किरकोळ वादातून एका इसमाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश शिंदे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मुलांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय जवळ पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले होते. यावेळी गावातील माऊली कुरंदळे मोठ्या आवाजात फटाके फोडत होता. दरम्यान फटक्याच्या आवाजाने गणेश यांची मुले घाबरु लागल्याने गणेश याने मी पाणी भरल्यावर फटाके फोडा, असे म्हटल्याने माऊली याने गणेशला शिवीगाळ, दमदाटी करत घरातील धारदार चाकू आणून तुला आता संपवूनच टाकतो, असे म्हणून गणेशच्या अंगावर वार केले.

सदर घटनेत गणेश शिंदे गंभीर जखमी झाला असून याबाबत गणेश युवराज शिंदे (वय ३५) रा. अण्णापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे रा. अण्णापूर (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्घ खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहे.