बेट भागात पुन्हा घरफोडी, दुचाकी, विदयुत मोटारींची चोरी…

क्राईम

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे शनिवार (दि. १०) मध्यरात्री देवराम शिंदे यांचे टाकळी हाजी-वडनेर रोडवरील शिंदेवस्ती येथील घर फोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तुंसह रोख रक्कम लंपास केली आहे.

शिंदे हे मुलांकडे पुण्याला गेले होते. घरी कुणीच नव्हते, याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून LCD टीव्ही तसेच कपाटातील रोख रक्कम लंपास करण्यात करण्यात आली आहे.

घरी कुणीच नसल्याने कपाटातील कपडे आणि घरातील साहित्य चोरट्यांनी घरातच अस्ताव्यस्त करून टाकले आहे. रस्त्याने जात असताना सकाळी घर फुटल्याचे बाळू शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माजी सरपंच दामुशेठ घोडे यांना कळवताच त्यांनी ताबडतोब तेथे धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व याबाबत शिंदे यांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना कळविले. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस अंमलदार दिपक पवार,विशाल पालवे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन तक्रार दाखल करून घेतली आहे.

पुढील तपास अनिल आगलावे करत आहेत. यापूर्वी ही या भागात दुकानांची चोरी, घरफोडी असे प्रकार घडलेले आहेत. त्याचा तपास अजून लागला नाही तोच असे प्रकार घडला असल्याने चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच शरदवाडी येथून एक दुचाकी गाडी आणि आमदाबाद येथून एक कृषी पंपाचीही चोरी झाली आहे. या भागातील चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचा तपास लावून गुन्हेगारांना अटक करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या आणि आजची चोरी या तिन्ही घटना एकसारख्याच घडल्या असून पोलिसांनी हे गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी सांगितले.