crime

अथर्व बीडकॉन व्यावसायिकावर गुन्हा दाखल

क्राईम

वाघोली: वाघोली (ता: हवेली) येथील एका बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.बांधलेल्या इमारतीची मजुरी व जीएसटी न देता एका बांधकाम व्यवसायिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार १५ मे २०१७ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत मांजरी बु.येथील अथर्वसृष्टी येथे घडला आहे.याबाबत प्रवीण शिवाजी कुसाळकर (वय४४,रा. सातव साहेब वाडा, वाघोली) यांनी फिर्याद दिली असून अथर्वसृष्टी बिल्डकॉनचे बिल्डर महेश एकनाथ थोरात (वय ४१ रा. मांजरी. खु), शिरीष निहालचंद लोढा (वय ३९,रा. गुलटेकडी,पुणे) यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून,आरोपी महेश थोरात त्यांच्या ओळखीचे आहेत.महेश थोरात यांनी फिर्यादी यांना अथर्वसृष्टी येथील इमारत बांधण्याचे काम दिले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी इमारतीचे काम केले. केलेल्या कामाचे पैसे माघण्यासाठी फिर्य़ादी हे थोरात यांच्याकडे गेले असता, त्यांनी पैसे देतो असे सांगितले. मात्र, त्याच दिवशी थोरात यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाकडे फिर्यादी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली.त्यानंतर त्यांच्यामध्ये समजुतीचा करारनामा झाला.

त्यानुसार आरोपींनी एक महिन्याच्या आत फिर्यादी यांना १ कोटी ५३ लाख रुपये कामाची मजुरी व जीएसटीची रक्कम देण्याचे ठरले होते. परंतु आरोपींनी फिर्य़ादी यांचे पैसे न देता जिवे मारण्याची धमकी देऊन खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.असे फिर्यादीचे म्हणणे आहे. याप्रकरणी आता लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.