गुप्तधन काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत..

क्राईम

औरंगाबाद: फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे गुप्तधन काढण्यासाठी व्यक्तीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. 27) नोव्हेंबर 2022 रोजी समोर आली. 3 जणांनी भगवान खरात यांना दारु पाजून विवस्त्र करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन लीगल सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

पीडित भगवान खरात यांनी जबाब दिल्यानंतर नरबळीबाबत कलम लावण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथील भगवान खरात यांना विठ्ठल फरकडे, भाऊसाहेब फरकदे या सवर्ण समाजाच्या व्यक्तीसह आणि कचरू खरात याने त्यांना घरातून बोलून बाहेर नेले. त्यानंतर त्यांना दारु पाजून एका ठिकाणी खड्ड्यात उतरण्यास सांगितले. आत गुप्तधन आहे, खाली उतर अस सांगितले.

मात्र भगवान यांना शंका आली आणि त्याने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध पडले. प्रकरण अंगलट येईल अस वाटल्याने त्यांनी भगवान यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून, त्यांना गावाबाहेर फेकून दिले.

सदर घटना 27 नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला असला तरी भीतीमुळे 4 डिसेंबरपर्यंत कुटुंबियांनी तक्रार दिली नाही. पोलिसांना याबाबत माहिती कळाल्यावर पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक केली. मात्र भगवान खरात बेशुद्ध असल्याने खरा प्रकार उघड झाला नव्हता. मात्र 19 जानेवारी रोजी त्यांनी पोलिसांना जबाब दिला आणि चित्र स्पष्ट झाले. तत्पूर्वीच पोलिसांनी ॲट्रॉसिटी व अंधश्रद्धा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, धन काढण्यासाठी विवस्त्र करून त्याच्यावर कोंबडे ओवाळून, जादूटोणा करून मारहाण करण्यात आली. तर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. गावाबाहेर ते बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांना सापडले. सुरुवातीला प्राथमिक उपचार केल्यानंतर घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी खरात यांचा एक पाय आणि हात निकामी झाला असल्याचे निष्पन्न झाले.

शस्त्रक्रिया करुन त्यांचा उजवा पाय कापण्यात आला. ते अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. वडोद बाजार पोलीस ठाण्यात खरात यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे