Crime

हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत मद्यपींना ठोठावला दंड…

क्राईम

पुणे (अरुणकुमार मोटे): हॉटेल व ढाब्यावर चालकासहीत अवैध मद्यसेवन करणा-यांवर केलेल्या कारवाईत न्यायालयाने अवैध मद्यपींना दंड ठोठवला आहे.

राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग, बीट क्र. १ यांनी मिळवलेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने वडगाव आनंद गावाचे हद्दीत पुणे -नाशिक हायवे लगत हॉटेल सानवी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे अचानक छापा टाकला असता हॉटेलचे मालक अमोल अनिल उमाप (वय ३३ वर्ष, रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर, जि. पुणे) याचे ताबे कब्जातून सदर दारुच्या गुत्यावर विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच रिकाम्या बाटल्या व मद्यपींसाठी किंवा ग्राहकांसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या, ग्लास व इतर साहित्य अंदाजे किंमत रु. १२६६० चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे. हॉटेल मालक याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६८ ए.बी अन्वये रितसर गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर अवैध गुत्यामध्ये अवैधरित्या मद्य सेवन करतांना आढळून आलेले सुभाष सुर्यभान गुंजाळ (वय ४४ वर्ष, रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) व विलास रमेश जाधव (वय ३८ वर्ष, रा. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन ते बेकायदेशीररित्या सुरु करण्यात आलेल्या दारूच्या गुत्यात मद्यसेवन करतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ अन्वये रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपींची प्रथमदर्शनी वैद्यकीय तपासनी शासकीय रुग्णालय, मंचर (ता. अंबेगाव, जि. पुणे) या ठिकाणी करण्यात आली. तसेच सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या रक्ताचे व लघवीचे नमुने ग्रामीण रुग्णालय, वारुळवाडी (नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे) यांचेकडून घेऊन सदर नमुने सिलबंद पाकीटामध्ये रासायनिक विश्लेषणाकरिता शासकीय प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास एस. एफ. ठेंगडे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगाव विभाग, बीट क्र. १ यांनी पुर्ण केला. सदर गुन्ह्याचा तपास २४ तासात पुर्ण करुन आरोपींविरुद्ध न्यायलयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असता न्यायालयाने अवैध गुत्यामध्ये अवैधरित्या मद्य सेवन करतांना आढळून आलेल्या मद्यपींना सिद्धपराधी ठरवून त्यांना द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत, उप-अधीक्षक युवराज शिंदे, उप अधीक्षक एस आर पाटील व निरीक्षक, अर्जुन पवार यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, विजय विंचुरकर, संदिप सुर्वे, व जयदास दाते यांचे पथकाने केली. राज्य उप्तादन शुल्क विभागाकडून नागरिकांना अवाहन करण्यात येते की, कुठल्याही अवैध हॉटेल /ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. तसेच अवैध हॉटेल / ढाबा मालक यांचेवर देखील रितसर गुन्ह्या नोंद करुन कडक कारवाई करण्यात येईल.”