शिरुरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याने ११ जणांवर गुन्हा दाखल…

क्राईम

शिरूर (तेजस फडके): शिरुर शहरात सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. शिरुर येथे वर्दळीच्या ठिकाणी काही युवक घोळक्याने उभे राहुन येणाऱ्या-जाणाऱ्या मुली तसेच महिलांची छेड काढत असतात. अशाच एका अतिउत्साही तरुणाला आणि त्यांच्या मित्रांना दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. शिरुर पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ५) दुपारी ४ च्या सुमारास निर्मान प्लाझा ते शिरुर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर भुषण चत्तर आणि त्याचे ८ ते १० मित्र दुचाकीवर केक ठेऊन भुषण याचा वाढदिवस साजरा करत होते. परंतु, त्याचवेळी पोलिस तिथे आल्याने दुचाकी गाडी तिथेच ठेवत सगळ्यांनी पळ काढला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याने पोलिसांनी सदर युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार नाजीम पठाण हे करत आहेत.

‘शाळेच्या तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक जागेवर अथवा रस्त्यावर कोठेही वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम करु नये. सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम करताना कोणीही आढळल्यास शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील. गुन्हा दाखल झाल्याने भविष्यात पासपोर्ट, शासकीय नोकरी मिळणार नाही तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष द्यावे,’ असे आवाहन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले आहे.

unique international school
unique international school