शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातून एका पोलिसाच्या फोर व्हीलर गाडीसह अनेक फोर व्हीलर गाडया चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अद्ययावत इलेक्ट्रॉनिक मशिन व बनावट चाव्यांचा वापर करून अँटोमॅटिक सिस्टीम असलेल्या टॉप मॉडेलच्या मोटारी काही मिनिटातच अद्यावत प्रणालीच्या साह्याने चोरून नेणाऱ्या सराईत टोळीच्या कुख्यात म्होरक्याला शिरूर पोलिसांसह, पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
शिरूर पोलिसांच्या साहाय्याने केलेल्या या कारवाईतील सराईताकडून शिरूर शहरातून चोरलेल्या दोन मोटारी हस्तगत केल्या आहेत. ओबीडी स्टार या इलेक्ट्रॉनिक मशिनसह लॅपटॉप, बनावट चाव्या, स्कू ड्रायव्हर, ड्रील मशिन हे चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. या चोरट्याने चक्क एका पोलिसाचीच मोटार चोरून नेली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष गांभीर्याने या मोटार चोरीचा छडा लावला. नदीम दाऊद शेख (रा. मु. पो. धाड, ता. जि. बुलडाणा) असे या सराईत मोटार चोराचे नाव असून, त्याला देऊळगाव राजा (बुलडाणा) येथून पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे.
शिरूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले योगेश आनंदा गुंड यांची एर्टिगा मोटार (क्र. एमएच१२ टीडी ०७०२) व शिरूर मधूनच चोरलेली स्विफ्ट (एमएच १७ एजे ७०८३) मोटारीसह सुमारे साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशाल जाधव व किशोर पवार (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्या मदतीने शिरूरसह, नगर व संगमनेर येथून मोटारी चोरल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण, नगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलडाणा या जिल्ह्यात चारचाकी मोटारी चोरीचे १९ गुन्हे दाखल असून, यापूर्वी त्याच्याकडून बारा मोटारी जप्त केल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे. शेख याला ताब्यात घेतल्यानंतर मोटार चोरांची मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व विशेषतः शिरूर परिसरात गेल्या दोन महिन्यांत मोटारी चोरी जाण्याचे चार प्रकार घडल्यानंतर पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिळीमकर यांच्या पथकातील तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, अतुल ढेरे, मंगेश थिगळे व सागर धुमाळ तसेच शिरूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकातील नाथसाहेब जगताप, विजय शिंदे, नीतेश थोरात, योगेश गुंड यांनी गेले काही दिवस संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यातून मोटार चोरी झालेल्या ठिकाणांच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यातून क्ल्यू मिळाल्याने पोलिस पथकाचा नदीम शेख याच्यावरील संशय बळावल्याने त्यांनी ठावठिकाणा शोधून काढला. त्यावेळी तो देऊळगाव राजा (बुलडाणा) परिसरात संशयास्पदरीत्या चावरत असताना पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या, तपासाअंती त्याच्याकडून दोन मोटारी जप्त केल्या.
मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या नदीम शेख याने काही साथीदारांच्या मदतीने आणखी दहा ते बारा मोटारी चोरल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने त्याची कसून चौकशी केली जात आहे. अँटोमॅटिक व अद्ययावत प्रणाली असलेल्या मोटारी चोरण्यासाठी शेख याने पंजाब मधील जुन्या बाजारातून ओबीडी स्टार नावाचे इलेक्ट्रॉनिक मशिन व मोटार कारच्या अनेक बनावट चाव्या मिळविल्या होत्या. चावीचे मॉडेल ज्या वर्षातील आहे, त्याच मोटारी हेरून त्या चोरून नेण्यावर लक्ष केंद्रित करणारा शेख चोरीपूर्वी मोटारीच्या काचेवर असलेले मंडिलचे वर्ष पाहून खात्री करून घेत असे. त्यानंतर चालकाच्या बाजूच्या काचेतून तार किंवा लोखंडी पातळ पट्टी टाकून दरवाजा उघडत असे. चोरलेल्या मोटारीची तमिळनाडू, कर्नाटक, पंजाब राज्यात विक्री करणे किंवा तिचे सुटे भाग काढून विक्री करण्याचा नदीम शेख याचा फंडा होता.
शिरूर शहरातून चारचाकी मारुती स्विफ्ट डिझायरची चोरी…
शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
शिरूर! तू येथे आईच्या घरी राहायचे नाही असे दोघे म्हणाले अन्…