cash

शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : जमिनीचा पंचनामा तक्रारदाराच्या बाजूने करुन देण्यासाठी आधी १० हजारांची मागणी केली. अखेर ७ हजारांवर सौदा झाल्यानंतर न्हावरे चौकात एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. ग्राम महसूल अधिकारी प्रमीला नागेश वानखेडे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी लाच लुचपत विभागाचे (एसीबी) पुण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश बाबासाहेब घरबुडे यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली आहे. आरोपी वानखेडे या शिरसगाव काटा (ता. शिरुर, जि. पुणे) येथे कार्यरत असून त्यांनी तक्रारदाराच्या जमिनीचा पंचनामा ‘अनुकूल’ करुन देण्यासाठी तसेच पुढेही मदत करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

एसीबीच्या पडताळणीत पंचासमक्ष लाच मागणी स्पष्ट झाली. १६ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजी चौक, न्हावरे–तळेगाव रोड येथे ठरल्याप्रमाणे ७ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. सरकारी पदाचा गैरवापर करुन आर्थिक लाभ घेतल्याचे पुरावे मिळाल्याने आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोलिस उपअधीक्षक भारती मोरे (एसीबी, पुणे) या करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरुर महसुल विभाग पुन्हा रडारवर…
या कारवाईमुळे शिरुर तालुक्यात खळबळ उडाली असुन महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड झाला आहे. शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात अवैध मुरुम उपसा तसेच वाळू उपसा चालु असुन याकडे स्थानिक महसूलचे अधिकारी तसेच कर्मचारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.