Shirur Robbery

शिरूरमध्ये पुन्हा घरफोडी, रोख रक्कमेसह सोने लांबविले…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी, टु – व्हीलर, फोर व्हीलर चोरी, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार, केबल चोरी सातत्याने होत आहे. गुन्हयांची मालिका थांबायला तयार नसून, चोरांचा सुळसुळाट झाला आहे.

शिरूर तालुक्यात विविध सामाजिक विषयावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना आरोपींकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. तरीही पोलिस प्रशासन त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी यांनी सांगितले आहे.

घरफोडीबाबत सविस्तर हकिकत अशी की, २१ जून रोजी सकाळी १० : ३० ते २२ जून रोजी पहाटे ०५ : ३० वाजण्याच्या पूर्वी गोलेगाव रोड येथील गट नं. ३२५ (ब) मधील रविंद्र सुर्यभान कळमकर (रा. पाचर्णे मळा, गोलेगाव रोड शिरूर) यांच्या राहत्या फ्लॅटच्या दरवाजाचे कडी व कोयंडा कापून त्याद्वारे चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले रोख पैसे व सोन्याचे दागिने असा एकूण किंमत ३, ७५, ००० रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.