darshana pawar

दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना; पोलिसांना सांगितले की…

क्राईम

पुणे : एमपीएससी परिक्षा पास झालेल्या दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरे याने दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरने वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती राहुल याने त्याच्या कबुलीजबाबात दिल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच अनावधानाने आपल्या हातून हे कृत्य घडल्याचेही त्याने सांगितले.

एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवारची वनअधिकारी पदी निवड झाली होती. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. शवविच्छेदन अहवालात दर्शना पवार हिच्या गळ्यावर वार केल्याचे समोर आले होते. राहुल हांडोरे याला अटक केल्यानंतर त्याने हत्या कशी केली, याबाबतचा खुलासा केला आहे. राहुलने दर्शनाला कसं संपवलं, हे पोलिसांनी सांगितलं आहे.

विवाहास नकार दिल्यामुळे राजगडावर जाताना त्यांच्यात वादावादी झाली. राग अनावर झाल्याने राहुलने आधी तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरने तीन ते चार वार केले, त्यानंतर तिच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. नंतर त्याने बाजूचा दगड उचलून तिच्या डोक्यावर जीवघेणा वार केला. दर्शनाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता, रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा राहुल याने केला आहे.

दर्शना हिचे लग्न ठरलेले कळताच राहुल हंडोरे अस्वस्थ झाला होता. त्याने दर्शनाच्या घरच्यांना सांगितलं की, थोडी वाट पहा मी देखील परीक्षेत यशस्वी होईल आणि मग मी दर्शनाशी लग्न करेल. पण घरच्यांनी राहुलला दाद दिली नाही. सत्कारासाठी दर्शना पुण्यात आली तेव्हा राहुल तिला ट्रेकिंगच्या बहाण्याने राजगडावर घेऊन गेला आणि तिथेच तिची हत्या केली.

वेगवेगळ्या राज्यात फिरत होता राहुल…
राहुलचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं नेमली होती. ही सगळी पथकं मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राहुलचे आणि दर्शनाचे फोन रेकॉर्ड काढले होते. त्यात दर्शना आणि राहुल नेमकं कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा शोध पोलिस या रेकॉर्डच्या माध्यमातून घेत होते. राहुलचं लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचे पहिलं लोकेशन बंगळूरू, कोलकाता आणि शेवटचे लोकेशन चंदीगडला दिसत होते. तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांना होता.