श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाई; दोन सराईत आरोपींना अटक

क्राईम

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांस अटक करण्यास श्रीगोंदा पोलिसांना यश आले असुन ज्ञानेश्वर काढण्या भोसले तसेच अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले (रा. कोळगाव, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर अशी केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी भानगाव येथील खंडू सखाराम बाबर यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि घरासमोर लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना खबऱ्या मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली की सदरचा गुन्हा कोळगाव येथील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर काढण्या भोसले, तसेच अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले यांनी केला आहे. त्या माहितीनुसार रामराव ढिकले. पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बो-हाडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे (दि.१७) ऑगस्ट रोजी गुन्हेगारी वस्त्यांवर कॉंबिंग ऑपरेशन केले असता ज्ञानेश्वर काढण्या भोसले, अविनाश उर्फ पिंट्या काढण्या भोसले हे दोन संशयित आरोपी मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी भानगांव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जे.शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बो-हाडे, सहायक फौजदार अंकुश ढवळे (SDPO) पोलिस नाईक गोकुळ इंगवले, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव यांनी केली आहे.