मोराची चिंचोलीच्या निधीबाबत ग्रामस्थांची अण्णा हजारेंना भेट

शिरूर तालुका

शिक्रापूर: मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव राष्ट्रीय पक्षी मोरांच्या अस्तित्वासाठी ओळखले जाणारे गाव असून यासाठी शासनाकडून चालू केलेला पर्यटन निधी हा तेरा वर्षापासून बंद झाला असल्याने सदर निधी चालू करण्यासाठी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव सातत्याने दुष्काळ ग्रस्त असून येथे कायमस्वरुपी पाणी टंचाई आहे. या गावात भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. त्यामुळे या भागात अनेक पर्यटक येत असतात. येथे काही वर्षापूर्वी शासनाकडून पर्यटन निधी मिळत होता मात्र २००९ पासून पर्यटन निधी बंद झाला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करुन काही मार्ग निघला नाही. परंतु घरातील मुलांना जपावे त्या प्रकारे ग्रामस्थ मोरांची घेतात मात्र अन्न, पाणी नसल्याने काही मोरांचे स्थलांतर झाले आहे.

पुढील काळात अशीच स्थिती राहीली तर मोरांसोबत ग्रामस्थ देखील स्थलांतरित होतील. येथे शेती व पिण्यासाठी देखील पाण्याची समस्या असताना शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते. चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला चासकमान धरणाचे पाणी जाऊन सुध्दा गावला फायदा होत नाही. त्यामुळे या चासकमानचे पाणी गावाला उपलब्ध व्हावे. यासाठी माजी सैनिक शामराव धुमाळ व नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा करत मोराची चिंचोली गावच्या समस्येसाठी अण्णांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.