शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन युवतीवर लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून युवतीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून कार्तिक राजेंद्र खलसे, असे अत्याचार करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
मुखई (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवतीसोबत कार्तिक याची ओळख झालेली असताना त्याने युवतीला कशाचे तरी आमिष दाखवत युवतीचे अपहरण करुन अहमदनगर जिल्ह्यात नेले. सदर ठिकाणी युवतीवर अत्याचार केला, याबाबत युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी प्रथम अपहरणचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर युवतीचा शोध घेत पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली असता कार्तिक याने तिच्यावर शरीर संबंध करत अत्याचार केल्याचे तिने सांगितल्याने पोलिसांनी सदर गुन्ह्यात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी वाढीव गुन्हे दाखल करत कार्तिक राजेंद्र खलसे (वय २२) रा. मुखई (ता. शिरुर) जि. पुणे यास अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.