कवठे येमाईत भरदिवसा घरफोडी
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरात अवघ्या चार दिवसांत पाच विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली आहे. तर कवठे येमाई येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मलठण येथील अष्टविनायक महामार्गालगत कॅनॉल रोडवरील विद्युत रोहित्र शुक्रवारी (दि. ६) मध्यरात्री फोडण्यात आले. चोरट्यांनी रोहित्रातील ऑईल खाली सांडवून आतील तांब्याच्या तारांची चोरी केली. याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ इंद्रजित दामोदर खरसाडे (रा. मलठण, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यानंतर सोमवारी (दि. ९) मिडगुलवाडी येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील रोहित्र फोडण्यात आले. त्याच दिवशी सविंदणे येथील डोंगर भागात कान्हूर मेसाई रस्त्यालगत असलेले रोहित्रही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुसऱ्याच दिवशी कवठे येमाई येथील गणेशनगर परिसरातील वेल्डिंग केलेले रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली.
या सलग घटनांमुळे कवठे येमाई, सविंदणे व मलठण परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वीज नसल्याने पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. “वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, कवठे येमाई (ता. शिरूर) येथे फत्तेश्वर मंदिराजवळील शरद सुनील गायकवाड यांच्या बंद घराचे दि. ११ रोजी दुपारी ११ ते ३ या वेळेत कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन तोळे सोने, चांदीचे दागिने आणि अंदाजे साडेसहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. घरातील सदस्य बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. बेट भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रोहित्र चोरीमुळे शेती व पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होत असल्याने पोलिसांनी नियमित रात्रगस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.