तोतया पोलीस निरीक्षक म्हणून खेड पोलीस ठाण्यात रुबाब करणाऱ्यास अटक

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): खेड तालुक्यात मी पोलीस निरीक्षक असुन माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे फोनवरुन सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल, असे म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली असून संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

खेड तालुक्यात तोतया पोलीस निरीक्षकाबाबत पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोली गावातील रोहन सिताराम गायकवाड यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर निंबाळकर याचा फोन आला की, मी तुम्हाला तुमच्या अदखलपात्र तक्रारीत मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल. गायकवाड यांनी खेड पोलिसांना याबाबतीत लगेचच माहिती दिली.

पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरु केली. तोतया निरीक्षकाला फोनवर विचारणा करुन पोलीस ठाण्यात बोलावले असता संदीपराजे निंबाळकर हे वाहनावर मागे पुढे पोलीस लिहिलेल्या तसेच पोलिसांचा अधिकृत लोगो असलेल्या दुचाकीवर पोलिस ठाण्यात रुबाबात हजर झाले. यावेळी खेड पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यात भांडाफोड केला. त्यावेळी त्याने त्याच्या कडील बनावट ओळखपत्र दाखवत मी नागपुरात ट्रेनिंग घेतले त्यानंतर सहा वर्षे आजारी रजा घेऊन पुन्हा पोलीस निरीक्षक पदावर काम करीत आहे असे खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांना सांगितले.

अखेर चौकशीत हा तोतया निघाला याबाबत सुनिल ज्ञानेश्वर बांडे यांनी फिर्याद दिल्याने खेड पोलिसांनी तोतया पोलीस निरीक्षक संदिपराजे गणतराव निंबाळकर रा. वारु ता. मावळ जि. पुणे याला अटक केली. तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर इसम एका अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या बायकोचा निंबाळकर हा भाऊ म्हणजे साहेबांचा मेहुणा असल्याचे समजते. त्यामुळे या तोतया निरीक्षकाने आणखी कोणकोणत्या तक्रारीत किती जणांना मदत केली ? किती माया गोळा केली ? याचा शोध घेण्याचे आव्हान खेड पोलिसांपुढे आहे.