Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील तिघांना नोकरीचे आमिष दाखवत वीस लाखांना गंडा…

क्राईम

शिरुर पोलीस ठाण्यात परप्रांतियांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील तिघा युवकांना केंद्रीय खाद्य विभाग तसेच केंद्रीय रेल्वे विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिघा परप्रांतीयांनी तब्बल 20 लाख 33 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे उपेंदरसिंग बदोरीया, दिनेश रामेश्वर व शुभम सील या तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील किरण फराटे हे नोकरीच्या शोधात असताना २०१९ मध्ये त्यांची ओळख उपेंदरसिंग यांच्या सोबत झाली. दरम्यान उपेंदरसिंग व त्याच्या दोन साथीदारांनी आम्ही युवकांना केंद्रीय खाद्य विभाग तसेच केंद्रीय रेल्वे विभागात शासकीय नोकरीत लावतो, असे म्हणून त्यांना काही पैशाची मागणी केली.

मात्र यावेळी किरण फराटे यांच्यासह त्यांचे चुलत भाऊ राहुल फराटे व नातेवाईक धनंजय इथापे या दोघांनी देखील काही पैसे देऊ केले, काही दिवसात कोरोनाचे सावट आल्याने सर्व काही थांबले गेले. मात्र त्यांनतर देखील तिघांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यामुळे किरण फराटे, राहुल फराटे व धनंजय इथापे या तिघांकडून उपेंदरसिंग सह त्याच्या 2 साथीदारांनी तब्बल 20 लाख 33 हजार रुपये घेतले त्यांनतर फराटे यांना बनावट जॉईन लेटर पाठवले. मात्र शासकीय नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याबाबत किरण रमेश फराटे (वय ४१) रा. मांडवगण फराटा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी उपेंदरसिंग बदोरीया रा. भिंड मध्यप्रदेश, दिनेश रामेश्वर रा. पनकीथाना जि. कानपूर उत्तरप्रदेश व शुभम सील रा. वाई जि. सातारा यांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव हे करत आहे.