शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावच्या हद्दीत सावी हॉटेलसमोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलांवर काळ्या रंगाच्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी रात्री ०९:४५ वाजता सदरवाडी गावच्या सावी हॉटेलसमोर नगर-पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर विद्या संदीप शेवाळे (वय ४२, रा. कारेगाव) या आपल्या कुटुंबासोबत रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील अनोळखी चालक भरधाव वेगाने, बेदरकारपणे व रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवत होता. त्याने त्यांच्या आई रुख्मिणी परशुराम मते यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात रुख्मिणी मते यांच्या डाव्या पायाचा खुबा, डावा दंड, तोंडाचा जबडा फ्रॅक्चर झाला असून उजव्या हाताला खरचटले आहे. छातीतसुद्धा किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर संबंधित चालक मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा कळमकर करीत आहेत.अपघातानंतर मोटारसायकल चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.