निर्जन ठिकाणी महिलेचा खून करुन पळून गेलेल्या आरोपीला जालन्यातून जेरबंद

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरुर) येथे अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खुण करुन तो फरार झाला होता. शिरुर पोलिसांनी कुठलाही माग मुस नसताना मोठया शिताफीने तपास करत अवघ्या १२ दिवसात आरोपीला गजाआड केले आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ९) डिसेंबर रोजी रात्री १८:३० वा. चे पुर्वी मौजे बाभुळसर बुा, (ता. शिरुर), जि. पुणे येथील खंडोबा मंदीराच्या मागे, भिमा नदीचे पात्रात महिला संगिता रमेश आडके (वय ४८) हिस अज्ञात कारणावरुन कोणीतरी अज्ञात इसमाने काठीने तीचे डोक्यात मारहाण करुन तीला गंभीर जखमी करून तीचा खुन करून तीला भिमा नदीचे पाण्यात ढकलून दिले. म्हणुन शिरुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८१६ / २०२२ भा.दं.वि.क. ३०२.२०१ प्रमाणे दि.१० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुशंगाने पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी व पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस पथकांना सुचना दिल्या व त्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेशित केले.

यातील गुन्हा घडले ठिकाण हे मौजे बाभुळसर या गावाजवळील भिमा नदीपात्रात असुन आजुबाजुचा परिसर बाभळीचे काटवणाने व्यापलेला असल्याने त्याठिकाणी लोकांची रहदारी अतिशय कमी आहे. सदर ठिकाणी घरगुती तत्वावर केवळ मासेमारी करणारे तुरळक लोक ये जा करत असतात. त्यामुळे गुन्हयाची उकल करणे आव्हानात्मक होते.

गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे आवश्यक असल्याने शिरुर पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सपोनि संदिप यादव, अभिजीत पवार, पोसई एकनाथ पाटील यांचे पथक तयार करुन वेगवेगळया संशयास्पद मुद्द्यांवर तपास सुरु केला. त्यामध्ये मयताचे नातेवाईक, गावातील इतर नागरिक घटनेच्या वेळी आजुबाजुस असणारे नागरिक यांचेकडे चौकशी केली. परिसरातील मोबाईल टॉवरचा डम डाटा घेवुन त्यावर तांत्रिक अभ्यास करून आरोपीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीएक सुगावा लागत नव्हता.

दरम्यानचे काळात गावातील ग्रामपंचायतीने बसविलेले तसेच खाजगी लोकांनी बसविलेले सर्व CCTV कॅमे-याचे फुटेज घेवुन ठेवण्यात आले होते. त्याचे पोलीस पथकाने बारकाईने पाहणी केली असता गावामध्ये एक व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटली म्हणुन सदर व्यक्तीची ओळख पटविण्याकरिता गावात चौकशी केली असता सदरचा व्यक्ती गावातील राहणारा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावाजवळ असणा-या ऊसतोड कामगारांकडे सदर इसमाबाबत माहिती घेतली असता तो घटना घडलेपासून गावातुन निघुन गेल्याचे समजले त्यामुळे त्याच्या ऊसतोड टोळी प्रमुखाच्या मदतीने त्याचा शोध घेण्यासाठी पोसई पवार यांच्या नेतृत्वाखाली पो.ना जगताप, पो.अं.हाळनोर, पो.अ. पिठले यांचे पोलीस पथक गठीत करुन जालना येथे रवाना केले.

पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नांव आतिश संतोष प्रधान वय २० वर्ष, रा. जोडवालसा, ता. भोकरदन, जि.जालना असे असल्याचे सांगुन त्याने सदरचा गुन्हा हा दारुच्या नशेत मयत संगिता रमेश आडके हिचे डोक्यात लाकडी काठीने मारहाण करुन तीचा खुन करून तीस भिमा नदीपात्रात ढकलुन दिल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घटटे व उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरुर उपविभाग यशवंत गवारी, पो.नि. सुरेशकुमार राऊत शिरुर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप यादव, पोसई अभिजीत पवार, डी.बी. पथक प्रमुख पोसई एकनाथ पाटील, मपोसई स्नेहल चरापले, पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, पोलीस अमलदार रघुनाथ हाळनोर, योगेश गुंड, प्रविण पिठले, पोलीस मित्र दिपक बढे, राहुल चौघुले यांनी केलेली आहे. आरोपीस (दि. २१) डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून त्याने सदरचा गुन्हा कोणत्या कारणामुळे केला याबाबत पुढील अधिक तपास पो. नि. सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.