शिरुर तालुक्यात आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील डोंगरगण येथे एका तरुणीच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिचा हात ओढत तु माझ्यासोबत आली नाहीस. तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारुन टाकीन. तसेच तुला मांडवातुन उचलून नेईन, तुझ्यावर ऍसिड हल्ला करीन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी निखील एकनाथ चोरे आणि विकास बाबाजी चोरे दोघे रा. डोंगरगण  (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 25) रोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास फिर्यादी तरुणी आणि तिची आई घरी असताना निखील एकनाथ चोरे व त्याचा मित्र विकास बाबाजी चोरे हे दोघेही मोटार सायकल वर आले. त्यातील निखील चोरे याने सदर तरुणीचा हात धरून त्याचेकडे ओढत तिचा विनयभंग केला. त्यावेळेस त्या तरुणीने नकार देत असताना त्याने तरुणीच्या मानेला धरून तिच्या कानाजवळ येवून तिला म्हणाला की, तु माझ्यासोबत आली नाही. तर मी तुझ्या मम्मी-पप्पाला मारुन टाकीन, तुझे लग्न होवू देणार नाही, तुला मांडवा मधून उचलून नेईन, तुझे तोंडावर ऍसिड फेकून मारीन अशी धमकी दिली.

त्यानंतर संबंधित युवतीने शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत निखिल एकनाथ चोरे आणि त्याचा मित्र विकास आबाजी चोरे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करत आहेत.