बिश्नोई गँगवर सरकारला काँग्रेसचा घेराव; कायदा-सुव्यवस्थेवर विजय वडेट्टीवार यांचे गंभीर प्रश्न

महाराष्ट्र

मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेल्या खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या वाढत्या घटनांवरून विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनल्याचा आरोप करत त्यांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर स्वीकारल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. अशा घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल केला की, लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील तुरुंगात असताना त्याची टोळी महाराष्ट्रात दहशत कशी निर्माण करत आहे? तुरुंगातून अथवा परदेशातून चालणाऱ्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे? तसेच महाराष्ट्र पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कोणती ठोस कारवाई केली आहे, याचाही त्यांनी जाब विचारला.

या प्रकरणात १२ आरोपींपैकी केवळ चार जणांना अटक झाली असून आठ आरोपी अद्याप फरार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मे महिन्यात घटना घडूनही सव्वा महिना उलटून मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नसल्याने तपासातील अपयश स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली.

प्रश्नोत्तराच्या तासात वडेट्टीवार म्हणाले की, व्यापाऱ्यांवरील गोळीबार, खंडणी, तसेच विविध व्यक्तींना मिळणाऱ्या धमक्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. आरोपी परदेशात आहेत किंवा व्हीपीएनचा वापर करतात, असे सांगून सरकार जबाबदारी टाळू शकत नाही. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच असून शुभम लोणकर आणि बिश्नोई गँगच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या गँगने गुन्हे करण्याची नवी पद्धत (Modus Operandi) अवलंबली आहे. धमक्या देऊन भाडोत्री गुंडांकडून घर, कार्यालय किंवा व्यावसायिक आस्थापनांजवळ गोळीबार करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र अशा भाडोत्री गुंडांवर कारवाई करण्यात आली असून गँगमध्येही वर्चस्वासाठी अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या संपूर्ण नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रभावीपणे काम करत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत