crime

शिरुर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला तीन वर्षे कारावासाची शिक्षा…

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथे सन 2018 ते सन 2021 या दरम्यान श्री मोरया हॉस्पिटल, या नावाने मेहमुद फारुख शेख (रा. पिर बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) याने डॉ. महेश पाटील या बनावट नावाने “श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ICU” हे चालवुन त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार केलेल्या पेशंटपैकी एकुण 7 कोविड पेशंट मयत झाले होते. याबाबत डॉ. शितलकुमार राम पाडवी यांनी या बोगस डॉक्टर विरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तपासा दरम्यान मेहमुद शेख दोषी सापडल्याने त्याला न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावास आणि 18 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मेहमुद फारुख शेख हा इयत्ता 12 अनुत्तीर्ण असतांना तसेच त्याचे वैद्यकिय क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचे शिक्षण झालेले नसतांना आणि त्याच्याकडे वैद्यकिय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसतांना देखील त्याने MBBS पदवीचे बनावट सर्टिफिकिट तयार करुन त्या आधारे डॉ. महेश पाटील या बनावट नावाने “श्री मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ICU” हे चालवुन हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंटवरती औषोधोपचार केले होते. कोवीड काळामध्ये त्याने औषोधोपचार केलेल्या पेशंटपैकी एकुण 7 कोविड पेशंट मयत झाले होते.

 

या प्रकरणी डॉ. शितलकुमार राम पाडवी (वय 45) रा. गार्डन व्हिला, नवापुर, ता. नवापुर, जि. नंदुरबार यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला बोगस डॉक्टर मेहमुद फारुख शेख याच्याविरुध्द महाराष्ट्र वैद्यकिय अधिनियम 1961 च्या कलम 33(2) अन्वये दि. 12 एप्रिल 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्ह्याचा तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत तसेच पोलिस हवालदार विलास आंबेकर यांनी करुन आरोपीविरुध्द शिरुर न्यायलयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर केसची सुनावणी चालु असतांना गुन्ह्यातील साक्षीदार यांना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी साक्षीबाबत ब्रिफिंग केल्याने सर्व साक्षीदार यांच्या साक्षी पुराव्याच्या आधारे शिरुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. सोनकांबळे यांनी दि. 26 डिसेंबर 2023 रोजी आरोपी मेहमुद फारुख शेख (रा. पिर-बु-हाणपुर, ता.जि. नांदेड) यास 3 वर्षे सश्रम कारावास आणि रुपये 18 हजार दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

 

सदर केसमध्ये सरकारी वकील अ‍ॅड माया क्षीरसागर व सिंगदर गुमानेकर यांनी काम पाहिले असुन कोर्ट अंमलदार पोलिस नाईक प्रकाश वाघमारे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी ताटे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले असुन सदर केसचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक, सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, माऊली शिंदे यांनी केला आहे.