शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे.
देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं गेल्या नाहीत…
सन २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ सदस्य निवडून आले. त्यावेळी सरपंच व उपसरपंच पदाच्या कालावधीबाबत भंडारा हातात घेऊन, पिंडीवर हात ठेवून देवांच्या शपथा घेण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष सरपंच निवड करताना अनेक सदस्यांना अंधारात ठेवत परस्पर पदांची वाटणी करण्यात आली. पहिल्याच सरपंचाने अडीच वर्षांचा कालावधी घेतल्याने इतर सदस्यांची अंतर्गत नाराजी उफाळून आली आणि ग्रामपंचायतीत अंतर्गत राजकीय कुरघोड्या सुरु झाल्या.
गावातील वाद साहेबांपर्यंत पोहोचले…
प्रत्येक वेळी सरपंच-उपसरपंच पदाचा वाद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नेण्याची वेळ आली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कारेगावातील हा ‘सावळा गोंधळ’ आता उघडपणे समोर आला आहे.
बाहेरचे सूत्रधार, आतले केवळ बाहुले…?
कारेगाव ग्रामपंचायतीत सातत्याने बाहेरील राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप सुरु असल्याचा आरोप होत आहे. पदांची वाटणी, स्वीकृती किंवा राजीनामे हे एका कथित ‘अदृश्य शक्ती’च्या इशाऱ्यावर होत असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य केवळ बाहुले बनले आहेत का…? अशी दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे. याच हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून, थेट ग्रामस्थांनाच राजीनाम्यासाठी बैठक बोलवावी लागली, हे गंभीर वास्तव आहे.
सर्व पक्षांना डावलणारी शक्ती कारेगावसाठी धोक्याची घंटा…?
कारेगावमध्ये राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (श.प.), भाजप, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा), जनता दल, प्रहार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सक्रिय आहेत. मात्र सध्याच्या घडीला ही ‘अदृश्य शक्ती’ सर्वच पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाला डावलत गावच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही शक्ती कारेगावकरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. कारेगावातील सत्तेच्या खेळामागे नेमकी कोणती ‘अदृश्य शक्ती’ आहे, याचा पर्दाफाश कधी होणार…? हा प्रश्न आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
वळसे पाटील लक्ष घालणार का…?
कारेगाव हे आमदार दिलीप वळसे पाटील यांचा हक्काचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र याच गावातील पदांच्या निवडीवरून सुरु असलेला सावळागोंधळ पाहता, स्वतः वळसे पाटलांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादीसमोर भाजपचे तगडे आव्हान असताना, हा वाद न मिटल्यास ग्रामस्थांची नाराजी राष्ट्रवादीला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.