बिबट्याने हल्ला केलेल्या त्या तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथे बुधवार (दि. १२) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या पूजा नरवडे या तरुणीवर काल गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी जांबूत (ता. शिरुर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अद्यापपर्यंत या भागात तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागल्याने संतप्त झालेल्या जांबूत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत गावच्या मुख्य चौकातच अंत्यसंस्कार करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या होणाऱ्या हल्ल्यांवर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

यावेळी वनविभागाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेवला. पशुधनाबरोबर बिबट्या आता घरात येऊन मानवाचे भक्ष करू लागला असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी जोरीलवण दोन वर्षीय चिमुरडीला बिबट्याने ओट्यावरून उचलून नेत ठार केले होते. एक महिन्यापूर्वी सचिन जोरी या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर बुधवार (दि.१२ ) रोजी पूजा नरवडे या तरुणीवर बिबट्याने हल्ला करत ठार केले.

जांबूत पिंपरखेड परिसरातील शेतमजुरांवर हल्ले करत जखमी केले तर अनेक पाळीव प्राण्यांना बिबट्याने ठार केले आहे. एवढ्या घटना घडूनही वनविभाग अजूनही बघ्याची भूमिका घेते काय ? या नरभक्षक बिबट्यांच्या तोंडाला मानवी रक्त लागले असल्याने अजून किती लोकांचे बळी जाण्याची वाट प्रशासन बघणार ? असे संतप्त सवाल ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी उपस्थित करत प्रशासनाचे कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला ठार मारा आणि बिबट्यांचे प्रजनन संक्रमण लक्षात घेता नसबंदी करणेसाठी तातडीने वरिष्ठ पातळीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त झाला नाही तर संपूर्ण बेट भाग बंद ठेऊन संबंधित वनविभाग प्रशासन, तहसील कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात येईल.

प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे असा इशारा माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिला आहे. तर शिरुर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट देत भ्रमणध्वनी वरुन केडगाव महावितरण विभागाचे अभियंता एडके यांचेशी संपर्क करत या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले असून येत्या 2 दिवसांत तात्काळ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात आपण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांचेशी संपर्क करुन वनविभाग तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी. यासाठी महावितरण विभागाला योग्य सूचना करण्यासंदर्भात विनंती केली. प्रसंगी अंत्यसंस्कारासाठी तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जांबूत या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी यांचेशी तातडीने चर्चा केलेली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत आराखडा तयार करुन मार्ग काढण्यात यावी अशी विनंती केली असून जुन्नर उपवनसंरक्षण अमोल सातपुते यांचेशी संपर्क करुन तातडीने सदर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. तरी या भागातील शेतकरी व नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

या परिसरात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात आजपर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. अनेकांवर जीवघेणे हल्ले झालेले आहे. सदर घटनांनी या भागातील शेतकरी अत्यंत भयभीत झालेला असून संतप्त शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी आहे. याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांना याबाबत माहिती दिलेली आहे. शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यात बहुतांशी भाग हा बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित असल्याने या चारही तालुक्यांना दिवसा वीज मिळावी.

याबाबत येत्या आठ दिवसांत महावितरण विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे. आज पर्यंत 3 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला असल्याने वनविभागाने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करुन महावितरण विभागाला याबाबत माहिती द्यावी. येत्या आठ दिवसांत याबाबत कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, असे मत मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले.

या भागातील बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता या परिसरात 14 पिंजरे लावण्यात आलेले असून पिंजऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून शेतातील लपलेले बिबट्यांना वाईल्डलाईफच्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपाययोजना करुन जास्तीत जास्त बिबटे जेरबंद करण्याचे काम चालू केले असून लवकरच बिबट्यांना जेरबंद करण्यात येईल. तरी या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.