शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) उसने दिलेल्या पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरुन झालेल्या वादातुन एका तरुणासह त्याच्या आई व मेव्हण्याला मारहाण केल्याची घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे घडली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी नाना सर्जेराव दगडे (वय ३३, व्यवसाय मेंढपाळ, रा. अरणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिमाजी भिवा पिंगळे, विशाल भिमाजी पिंगळे आणि कांताबाई भिमाजी पिंगळे (सर्व रा. भांबर्डे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि २५ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास निमगाव म्हाळुंगी गावातील पीडीसीसी बँकेसमोरील कासारी रोड येथे ही घटना घडली. फिर्यादीने आरोपींकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता, त्याचा राग मनात धरुन आरोपींनी शिवीगाळ करत वाद घातला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीची आई यमुना दगडे (वय ५०) आणि मेव्हणा धुळा पांडुरंग कोकरे (वय ३०) यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी मध्ये पडून त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी भिमा पिंगळे याने फिर्यादीच्या डोक्यात हाताने मारहाण करुन दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर जखमींनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असुन शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार संदीप इथापे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.