रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती रोडवरील आयटीसी कंपनीच्या चमडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे व साबण असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरण्याची धाडसी घटना घडली होती. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत चोरीचा छडा लावत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
View this post on Instagram
आयटीसी कंपनीचा माल ट्रान्सपोर्टद्वारे डिलरकडे पाठवण्यासाठी ‘मुव्हींग लॉजिस्टिक प्रा. लि.’च्या चार इलेक्ट्रिक पिकअप वाहनांचा वापर केला जातो. ही वाहने रात्रीच्या वेळी माल चलनासह भरून गोडाऊन परिसरात उभी करण्यात येतात. याच संधीचा फायदा घेत १७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ६.४० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मालाने भरलेला एक इलेक्ट्रिक पिकअप वाहन चालू करून गेटवरील नोंद करून पळवून नेला. या वाहनातील सिगारेट व इतर मालाची किंमत सुमारे ६५ लाख ९८ हजार ८९७ रुपये इतकी होती. या घटनेप्रकरणी दीपक देवदास शिंदे (रा. लोणीकंद, मगर वस्ती, ता. हवेली) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भादंवि कलम ३०३/२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
औद्योगिक क्षेत्रातील ही मोठी चोरी गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांनी विशेष लक्ष देत स्वतंत्र तपास पथके नेमण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना चोरट्यांनी चोरी केलेला पिकअप गोडाऊनपासून काही अंतरावर सोडून दिल्याचे आढळून आले. मात्र त्यातील सुमारे ५४ लाख ५३ हजार रुपयांच्या सिगारेट चोरट्यांनी दुसऱ्या वाहनातून नेल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. वाघोली परिसरात संशयित वाहनाचा शोध घेत असताना ते वाहन कावेरी हॉटेल येथे डिलिव्हरी करताना आढळून आले. चौकशीत सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दीपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ मुल्ला यांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रथमेश चव्हाण (रा. वाघोली, ता. हवेली) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६८ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. दीपक ज्ञानेश्वर ढेरंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर, सिंहगड रोड व लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचे आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे, अमोल रासकर यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले
रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील ‘कोयता गँग’ च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या
रांजणगाव पोलिसांनी व्हर्लफुल कंपनीतील चोरी प्रकरणी आरोपी अटक करत 10 रेफ्रिजरेटर केले जप्त
कौतुकास्पद; रांजणगाव पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणा-या व्यक्तीस साहित्यासह केली अटक