पोलिस आणि पत्रकारांचे विशेष मुलांसोबत अनोखे रक्षाबंधन 

मुख्य बातम्या

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील पोलिस आणि पत्रकार यांनी विशेष मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्या मुलांच्या हस्ते राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे.या वर्षी पोलिस व पत्रकार यांचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक केले. गेले 2 वर्षे कोरोना संकटामुळे सर्वच शाळा बंद होत्या. या संकटात विशेष मुलांचे मोठे हाल झाले. त्यानंतर सध्या शाळा सुरु झाल्याने संस्था चालविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर उपस्थित पत्रकार मित्रांनी व पोलिस अधिकाऱ्यांनी देखील प्रत्येक अडचणीत ठाम मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांना दिली.

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी बोलताना सांगितले की, विशेष मुलांचा सांभाळ करणे हे आव्हान असते. कोरोना नंतर परिस्थिती बदलली आहे. पुढील काळात जी शक्य असेल ती मदत केली जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी पत्रकार अभिजीत आंबेकर, तेजस फडके, रवींद्र खुडे, किरण पिंगळे, सतीश केदारी, शैलेश जाधव, महिला पोलिस नाईक रेखा टोपे, पोलिस नाईक प्रताप टेंगले, मीना गवारे यांसह विशेष शिक्षिका अर्चना पाचर्णे, कीर्ती वाखारे, स्टाफ व मुले आवर्जून उपस्थित होते.