Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरण अन् पोलिस, पत्रकार आणि खंडणी…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. ८) घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पण, आत्महत्येनंतर शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. आत्महत्येचे खरे कारण काय? याबद्दल माहिती मिळणे राहिले दूर. पण, पोलिस, पत्रकार आणि खंडणीचा विषय पुढे आल्यामुळे नागरिक आजूनच मोठ्या संभ्रमात सापडले आहेत.

अंजली गायकवाड यांनी आत्महत्या केल्यानंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती. प्रथम सुसाईड नोट गायब झाली होती. पण, नंतर ती पोलिसांना मिळाली. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांकडून काय कारवाई होते? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सुरवातीला तर हे प्रकरण दाबले जाणार? पैशापुढे कोणाचे काही चालत नाही, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. पण, सुसाईड नोट सापडल्यानंतरही काय कारवाई झाली? याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे. महिलेने कशामुळे आत्महत्या केली? कारण काय? किंवा यामागील आरोपी कोण आहे? काही कळत नसल्यामुळे या प्रकरणाची ‘सेटलमेंट’ झाली की काय? मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला. अनेकांनी हात धुवून घेतला. प्रकरण दाबले गेले, अशा चर्चा सुरू आहेत.

एखाद्या महिलेने आत्महत्येसारखे पाऊल उचलणे म्हणजेच यामागे नक्कीच मोठे कारण असू शकते. नागरिकांना समजते ते पोलिसांना का समजत नाही? एखादा साधा गुन्हा दाखल असेल तर सर्वसामान्य नागरिकावर पोलिस तत्काळ कारवाई करतात. मग, आत्महत्येसारख्या विषयावर पोलिस काहीच का करत नाहीत? याबद्दल नागरिक विविध तर्क-वितर्क लढवत आहेत.

साहेबांची दहा लाख रुपयांची ‘डिमांड’…

अंजली गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर संदीप कुटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये साहेबांनी 10 लाख रुपयांची ‘डिमांड’ केली असल्याचे म्हटले आहे. शिवाय, पत्रकारही मॅनेज करावे लागतील असे म्हटले आहे. यामुळे मूळ मुद्दा म्हणजे आरोपी राहिला बाजूला आणि पोलिस अधिकाऱ्याची ‘डिमांड’ आणि पत्रकारांच्या ‘मॅनेज’चा विषय पुढे आला आहे. यामुळे या प्रकरणात पत्रकारांची विनाकारण बदनामी करुन नक्कीच वेगळा काहीतरी डाव शिजत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत.