शिरुर तालुक्यातुन तब्बल पाच किलो गांजा जप्त करत कारसह एक जण ताब्यात…

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर पोलिसांची कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून सदर कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला दोन युवक गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर तेलंग, पोलीस शिपाई निखील रावडे, भास्कर बुधवंत, किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी जात सापळा रचला असता त्यांना एम एच १२ के टी ८००८ हि संशयित काळ्या रंगाची व काळ्या काचा असलेली कार आलेली दिसली.

यावेळी पोलिसांची चाहूल लागताच कार मधील एक युवक पळून गेला त्यावेळी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेत कारची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी तब्बल पाच किलो गांजा सह कार जप्त केली.

याबाबत पोलीस शिपाई भास्कर महादेव बुधवंत रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रमेश लक्ष्मण पिंगळे (वय २2) रा. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे व राहुल दौंडकर रा. चिंचोशी ता. खेड जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत रमेश लक्ष्मण पिंगळे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.

काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करणार; प्रमोद क्षिरसागर

काळ्या काचांच्या वाहनातून अनेकदा काही गुन्हे घडत तसेच गांजा, दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते मात्र काळ्या काचांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने लवकरच आपण परिसरातील काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करणार असल्याच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.