चोरी करायला गेला अन फरार असलेला आरोपी पोलिसांच्या हाती सापडला

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके)अहमदनगर जिल्ह्यात गुन्हा करुन तीन महिने पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली अन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता. पोलिसी खाक्या दाखवताचं अहमदनगर मधील कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्याने आणखीन एक गंभीर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. किरण अरुण शिंदे (वय 22) रा. बुरडगाव चाणक्य हॉटेल समोर, ता. जि. नगर असे आरोपीचे नाव आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 18) सप्टेंबर रोजी येथील औद्योगिक वसाहतीत फिर्यादी अन्सार हारुन शेख (वय 27) हा कंटेनर चालक रात्री 9 च्या सुमारास कंटेनरमध्ये झोपलेला असताना त्याचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. त्यामुळे तो फिर्याद देण्यासाठी पोलिस स्टेशनला जात असताना रात्रीच्या गस्तीवर असलेले रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके आणि पोलिस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे हे तिथुन जात होते. त्यावेळेस कंटेनर चालकाने त्यांना मोबाईल चोरी गेल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने हालचाल करुन दोन तासाच्या आत आरोपी किरण अरुण शिंदे याला ताब्यात घेतले असता त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकातील पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी करत पोलिसी खाक्या दाखवला असता सदर आरोपीने अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी कोतवाली पोलिसांना संपर्क साधुन आरोपीस त्यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.