करंदीतील युवकाच्या प्रामाणिकपणामुळे बँक अधिकारी अचंबित

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) सध्या अनेक ठिकाणी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याचे प्रकार घडत असताना नागरिकांचे बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार घडत असून एका युवकाच्या बँक खात्यावर चुकून आलेले दोन लाख रुपये नागरिकाने प्रामाणिकपणे बँकेला दिल्याने बँक अधिकारी देखील अचंबित झाले आहे.

शिक्रापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये करंदी येथील शरद गणपत दरेकर यांचे खाते असून 20 सप्टेंबर रोजी शरद दरेकर यांनी बँकेतून सोने तारण कर्ज घेतले यावेळी कर्जाच्या रकमेचे एक लाख पाच हजार दरेकर यांच्या बँक खात्यावर जमा झाले. त्यांनतर काही वेळाने पुन्हा एक लाख पाच हजार जमा झाले यावेळी दरेकर यांना थोडी शंका आली मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा एक लाख पाच हजार जमा झाल्याने दरेकर यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यामुळे त्यांनी काही मित्रांसह बँकेत जात घडलेला प्रकार बँक अधिकाऱ्यांना सांगत बँकेकडून चुकुन आलेले दोन लाख दहा हजार रुपये बँकेला प्रामाणिकपणे परत केले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक अमूल नाफडे, धनंजय चट्टे, शरद दरेकर, विशाल पाबळे, निलेश गुंड यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान यावेळी बोलताना घडलेला प्रकार बँकेच्या ऑडिट वेळी लक्षात आला असता इतर वेळी आमच्या खात्यातून पैसे कट झाले अशी तक्रार घेऊन नागरिक येतात मात्र शरद दरेकर यांनी स्वतः बँकेत येत खात्यावर दोन लाख दहा हजार जादा आल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हीच आच्छर्यचकित झालो असे बँकेचे व्यवस्थापक अमूल नाफडे यांनी सांगत शरद दरेकर यांचा बँकेच्या वतीने सन्मान केला.

शरद दरेकर यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा – वंदना साबळे

करंदी गावातील शरद दरेकर यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा कौतुकास्पद असून प्रत्येक नागरिकाने शरद दरेकर त्यांचा आदर्श घेत समाजामध्ये प्रामाणिकपणा दाखवावा ज्यामुळे नक्कीच चांगली पिढी घडेल असे करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे यांनी सांगितले.