शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील सुभाष धुमाळ हे मनाली येथे फिरण्यासाठी गेलेले असताना त्यांनी त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम कपाटात ठेवून बंगल्याला कुलूप लावले होते. त्यांनतर दोन दिवसांनी शेजारील नागरिकांना गेट व दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी याबाबत धुमाळ यांना फोन करुन सांगितले. मात्र धुमाळ मनाली येथे असल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर धुमाळ हे पुन्हा घरी आले असताना त्यांना असता घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्त व कपाट उघडे असल्याचे दिसले. त्यामुळे कपाटाची पाहणी केली असता कपाटातील रोख 5 लाख रुपये तसेच साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे साडे 8 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. दरम्यान धुमाळ यांनी बंगल्याच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता २४ मे २०२३ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात घुसून चोरी केल्याचे उघड झाले.

याबाबत सुभाष मधुकर धुमाळ (वय ५७) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.