सावधान; शिरुर तालुक्यातील खोली मालकांनो तुमचा भाडेकरु काही गैरप्रकार तर करत नाही ना…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील उरुळी देवाची इथं एका भाडेकरुने मालकाने हॉर्न वाजवून झोपमोड केल्याच्या रागातुन खोली मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची हत्या केली. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असुन शिरुर तालुक्यातही शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव या गावात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करणारी अनेक गुंड प्रवृत्तीची लोक भाड्याच्या खोलीत राहत असुन घरमालकांनी खोल्या भाड्याने देताना त्यांची सखोल चौकशी करुन संबंधित ग्रामपंचायत आणि पोलिस स्टेशन यांच्याकडे प्रत्येक भाडेकरुंची माहिती देणे गरजेचे आहे.

 

शिरुर तालुक्यात 25 वर्षांपुर्वी रांजणगाव औद्योगिक वसाहत उभी राहिली. त्यामुळे विदर्भ, मराठवाडयासह लाखोंच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातुन परप्रांतीय कामगार विविध कंपनीत कामाच्या निमित्ताने शिरुर तालुक्यात आले. पुणे-नगर महामार्गाच्या लगतच कोरेगाव भिमा, शिक्रापुर, सणसवाडी, रांजणगाव, ढोकसांगवी, कारेगाव या गावात या कामगारांना राहण्यासाठी अनेकांनी मोठया मोठया इमारती बांधल्या. तसेच काही खोली मालकांनी भाड्याच्या हव्यासापोटी भाडेकरुंची सखोल चौकशी न करता त्यांना खोल्या भाड्यानेही दिल्या. परंतु मागील काही वर्षात भाड्याच्या खोल्यामध्ये राहणारे अनेक भाडेकरु गैरप्रकार करुन पोबारा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत हि आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्याने आपल्या देशाच्या विविध भागातुन कामगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात. त्यातील अनेक कामगार हे शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव, शिरुर या ठिकाणी भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. त्यातले काही कामगार हे थोड्याच दिवसांसाठी कामाला आलेले असतात. परंतु त्यातील काही कामगार हे तडीपार गुन्हेगार असतात. परंतु खोली मालक त्यांच्याकडे कसलीही सखोल चौकशी न करता तसेच कोणताही कायदेशीर भाडेकरार न करता त्यांना भाडेकरु म्हणुन ठेवतात.

 

परंतु सदरचा प्रकार गंभीर असुन रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सन 2011 साली काम करणारे दोन नक्षलवादी ढोकसांगवी येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते. काही दिवसांपुर्वी रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत एक बांगलादेशी आरोपी सापडला होता. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरुंची सखोल माहिती घेऊनच त्यांना खोली भाड्याने देण गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खोलीत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांच वास्तव्य असल्यास तुम्हाला आणि आसपासच्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो.

 

यश इन चौकात रात्री चालतोय गैरप्रकार…?

कारेगाव येथील यश इन चौकात स्थानिक ग्रामस्थांच्या तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मोठया मोठया इमारती असुन या इमारतीत दिवसाढवळ्या सर्रास गैरप्रकार चालु असल्याचे निदर्शनास येत असुन काही इमारतीमध्ये रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर वेश्या व्यवसायही चालत असल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच रात्रीच्या वेळेस यश इन चौकाच्या आतील बाजूस असणाऱ्या इमारतीच्या दिशेला पोलिसांनी गस्त घालण्याचीही काही जागरुक नागरीकांनी मागणी केली आहे.