शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह अवकाळी पाऊस

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यासह बेट भागातील सविंदणे, कवठे येमाई, मलठण, चांडोह, फाकटे, जांबूत, माळवाडी, टाकळी हाजी, आमदाबाद, शरदवाडी या परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली असून शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहे. या अवकाळी गारपीटीमुळे ऊस, बटाटा,कांदा,मका, ज्वारी, डाळींब, गहू आदी पिके भुईसपाट झाली असुन यावेळी सविंदणे सह अनेक गावात शेतामध्ये, रस्त्यावर गारांचा खच पडला होता. त्यामुळे शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

सध्या शिरुर तालुक्यात दुष्काळाचे सावट असताना सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यानंतर मोठया आशेने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी आणि लावगड केली होती. परंतु आज झालेल्या अवकाळी वादळासह गारपीटीने हाता तोडांशी आलेली पिके उध्वस्त करत शेतकऱ्यांची स्वप्ने चकणाचूर केली असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या वर्षी दुष्काळ व गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकेतून घेतलेले पीककर्ज कसे फेडावे असा प्रश्न उभा राहिला आहे. शासणाने याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना अनुदान देणे गरजेचे आहे.