बेट भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची दिपीका भालेराव यांची मागणी

मुख्य बातम्या

कारवाई न झाल्यास 17 डिसेंबर पासुन आमरण उपोषणचा इशारा 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे, मलठण तसेच आसपासच्या गावांमध्ये हॉटेल व इतर ठिकाणी तसेच शाळांच्या आसपासच्या परीसरात मोठया प्रमाणात दारुविक्री, मटका, जुगार असे अवैध व्यवसाय चालु असुन या अवैध व्यावसायिकांना सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा समज देऊन हे धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु हे अवैध धंदे करणारे लोक मुजोर झाले असुन हे लोक सामाजिक कार्यकर्त्यांनाच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशनच्या शिरुर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपीका भालेराव यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिले आहे.

या निवेदनात कवठे येमाई या ठिकाणी सदाशिव घोडे हा व्यक्ती खुलेआम सर्व प्रकारचे अवैध धंदे चालवत असुन एका महिलेच्या तक्रारीवरुन दिपीका भालेराव त्या ठिकाणी प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी गेल्या असता. सदर व्यक्तीने भालेराव यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मी पोलिसांना हप्ते देतो त्यामुळे माझा धंदा कुणीच बंद करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे या व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दिपीका भालेराव यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे.

तसेच या निवेदनाची दखल न घेतल्यास भीम आर्मीचे राज्य प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली 17 डिसेंबर 2022 पासुन शिरुर पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी शिरुर तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कविता भवार, शिरुर, पारनेर, श्रीगोंदाचे प्रभारी संदीप शेलार, शिरुर तालुका मतदार संघाचे अध्यक्ष संजय सोनवणे, पारनेर तालुकाध्यक्ष मनोज जगताप, रांजणगाव- कारेगावचे अध्यक्ष प्रतिक जगताप, शिरुर तालुका कार्याध्यक्ष गणेश राहते, गणेश जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरुर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई करत लाखोंची दंड वसुली

याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले, शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये 1 जानेवारी 2022 ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर एकुण 116 केसेस दाखल केल्या असुन त्यात 121 आरोपिंना अटक करुन त्यांच्याकडुन एकुण 15 लाख 33 हजार 204 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये टाकळी हाजी औट अंतर्गत 55 केसेस मध्ये 14 लाख 24 हजार 105 रुपयांचा मु्देमाल जप्त, मांडवगण फराटा औट पोस्ट अंतर्गत 37 केसेस मध्ये 64 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त, निमोणे, न्हावरे बिट शिरुर शहर एकुण 24 केसेस मध्ये 44 हजार 659 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ताडी, गावठी हातभट्टी दारु, देशी विदेशी दारु व गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन छापा मारला त्याच ठिकाणी कच्चे रसायन साठवून ठेवलेले बॅरल यांची जागीच विल्हेवाट लावलेली असल्याचे सुरेशकुमार राऊत यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले. तसेच जर शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे चालु असतील तर त्यांनी तात्काळ 9823108452 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.