शिरुर पंचायत समितीतील वृक्षतोड प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समिती कार्यालयातील वडाची मोठी झाडे रात्रीच्या वेळी बेकायदा तोडून त्याची चोरी करुन विल्हेवाट लावल्याप्रकरणी पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यासह त्यात सामील असणाऱ्या कर्मचारी आणि त्यांना साथ देणाऱ्या अज्ञात लोकांवर शिरुर नगरपरिषदेने तातडीने गुन्हे दाखल करुन निलंबित करण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे हे शिरुर नगरपरीषदेपुढे येत्या ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी आज (दि 28) रोजी शिरुर येथे पत्रकार परीषदेत सांगितले.

दरवर्षी शासन झाडे लावण्यासाठी आणि जगवण्यासाठी कोटयावधी रुपये खर्च करते.परंतू शिरुरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनीच मोठी वडाची झाडे तोडून त्याची चोरुन विक्री केली आहे. कुठलाही लिलाव न करता वनविभागाची परवानगी न घेता ही झाडे रात्रीच्या वेळी कापून विक्री करण्याची र्दुबुद्धी सुचल्याने कुंपणच शेण खात असल्याचे निदर्शनात आले आहे. या वडाच्या झाडाची महीला वर्ग गेल्या अनेक वर्षापासून वटपोर्णिमेला पुजा करत असत. हे झाड कापल्यामुळे महीला वर्गातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हे झाड अडचणीचेही ठरत नव्हते. याबाबत नाथा पाचर्णे यांनी रात्री वृक्षतोडीचा घडलेला सगळा पुरावा मोबाईलमध्ये कैद केला असून शिरुर नगरपरिषदेकडे २० दिवसांपुर्वी तक्रारी अर्ज केला आहे.

परंतू नगर परिषद प्रशासन या शासकिय आधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहे. या पत्रकार परिषदेसाठी नाथा पाचर्णे यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद, कॉग्रेस आयचे तालुका सरचिटणीस फैजल पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष युवराज सोनार, सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना काँग्रेस आयचे तालुका सरचिटणीस फैजल पठाण म्हणाले, पंचायत समितीच्या आवारात असलेली दोन वडाच्या झाडांसह इतरही काही झाडे तोडल्याने भर उन्हाळयात पक्षांचा निवारा नाहीसा झाला आहे. तसेच हि झाडे कापल्याने अनेक पक्ष्यांच्या पिलांचा जीव गेला आहे. त्यामुळे शिरुर शहरातील निसर्गप्रेमी संघटना व महीला वर्गाच्या भावना दुखावल्या असून हे निर्दयी कृत्य करणाऱ्या आधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही झाली पाहीजे.

कायदा सर्वांनाच सारखा…

तसेच या प्रकरणात नगर परिषदेकडून कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. पशूपक्षांचा जीव घेऊन निसर्गाचा समतोल बिघडवण्याऱ्या या आधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही. या आधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली 93 ग्रामपंचायती असून त्यातील पदाधिकारी यांचा काय आदर्श घेणार…? कायदा सर्वांना समान असून या आधिका-यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने बहुजन मुफ्ती पार्टीचे फिरोज सय्यद हे या उपोषणाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले आहे.