दरेकरवाडीतील उद्घाटन फलक चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

ग्रामपंचायत सदस्याची ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असताना सदर कामाचे दोन वेगवेगळे भूमिपूजन होऊन तीन वेगवेगले फलक लावण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक चोरीला गेल्याने गायब झालेले उद्घाटन फलक चोरणाऱ्याची चौकशी करुन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दरेकर यांनी केली आहे.

दरेकरवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायत साठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या नावाचा फलक लावून सदर योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी सदर फलक काढून आमदारांच्या नावाचा फलक लावत पुन्हा आमदारांच्या हस्ते भूमिपूजन केले. मात्र त्यानंतर गावामध्ये अनेकानानी संतप्त भावना व्यक्त केल्याने पुन्हा तिसरा फलक लावण्यात आला. त्यामुळे सदर कामासाठी श्रेय घेण्याबाबतच्या सर्व घटना अल्स्याचे उघड झाले.

मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक गायब झाला असल्यामुळे सदर प्रकारांची सखोल चौकशी करुन ग्रामविकास अधिकारी यांनी फलक चोरणाऱ्या व्यक्तीवर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दरेकर यांनी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ घाडगे यांच्याकडे केली आहे.

दरेकरवाडी मध्ये सदर कामाचे उद्घाटन झाले मात्र त्याबाबतचा फलक ठेकेदाराने बनवून आणलेला अल्स्याने त्याबाबतचे रेकॉर्ड आपल्याकडे नाही. मात्र याबाबत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ घाडगे यांनी सांगितले.