रांजणगाव MIDC तील बेशिस्त पार्किंगला आळा बसणार का…?

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित MIDC मध्ये सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या असुन या कंपनीत बाहेरुन अनेक माल वाहतुक वाहने येत असतात. औद्योगिक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी वाहनतळ हे फक्त “कागदावरच” असुन अनेक कंपनीच्या बाहेर कायमच दुतर्फा अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन कंपनीच्या गेटच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या गाड्यांची सोय कंपनीच्या आत करावी अन्यथा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सदर कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील) आणि शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांनी केली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र च्या वतीने १ फेब्रुवारी २०२२ रोजी ढोकसांगवी ग्रामपंचायतला याबाबत पत्र दिले होते. तसेच शिरुर तहसिलदार यांना १७ मार्च २०२२ रोजी तर रांजणगाव पोलीस स्टेशनला १४ फेब्रुवारी २०२२ आणि २३ मार्च २०२२ रोजी अनधिकृत पार्किंग बाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता चिंचवड यांना २२ मार्च २०२२ रोजी याबाबत पत्र दिले होते. परंतु याबाबत अजुनही काही कार्यवाही झालेली नाही. रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील कंपनी चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कायम दुतर्फा अवजड वाहनांची गर्दी असते. त्यामुळे सकाळी शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारे कामगार यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.

अन्यथा उपोषणाचा मार्ग हाच पर्याय…?
याबाबत बोलताना भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील) आणि शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे म्हणाले गेले सहा महिने आम्ही जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, MIDC चे चिंचवड येथील कार्यकारी अभियंता, तहसिलदार, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन, रांजणगाव स्थापत्य विभागाचे उपअभियंता यांना निवेदने देऊन वारंवार अवैध वाहने पार्किंग करत असल्याबाबत पाठपुरावा केलेला आहे. त्याबाबत रांजणगाव येथील स्थापत्य विभागाचे उपअभियंता कासार यांनी अनेक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्डही लावलेले आहेत. परंतु रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील कंपनी चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजुनही बेशिस्तपणे दुतर्फा वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे MIDC त ज्या कंपनीच्या बाहेर अवैधपणे वाहने उभी असतात त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

बेशिस्त वाहनांवर कारवाई करत लाखोंची दंड वसुली…
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील बेशिस्त वाहनांच्या कारवाईबाबत रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे म्हणाले, आम्ही MIDC त कोणत्याही कंपनीच्या बाहेर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करत हजारो रुपयांची दंड वसुली केलेली आहे. तसेच रांजणगाव इंडस्ट्रियल असोशियन (RIA) ची बैठक घेऊन प्रत्येक कंपनीच्या व्यवस्थापनाला याबाबत तोंडी तसेच लेखी सूचना दिलेल्या आहेत. यापुढेही बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई सुरुच राहणार आहे.