sanaswadi-crime

शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा फरार खंडणीखोर महेश जगताप जेरबंद

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख ) सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी घेतल्याबाबत गुन्हे दाखल होऊन चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महेश जगतापला जेरबंद करण्यात अखेर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे.

सणसवाडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ठेकेदार फुलसिंग यादव हे चार मे २०२२ रोजी कंपनीतून रात्रीच्या सुमारास घरी जात असताना काही युवकांनी त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात शिवीगाळ, दमदाटी करुन लाकडी दांडक्याने मारहाण करत महेश जगताप माहित आहे का आम्ही त्याची माणसे आहोत, तुम्ही आम्हाला साडेतीन लाख रुपये द्यायचे नाहीतर मारून टाकण्याची तसेच हत्याराने खून करण्याची धमकी देत त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेतली होती. याबाबत फुलसिंग रेवती यादव (वय ४७) रा. श्रीरामनगर, चाकण ता. खेड जि. पुणे मूळ (रा. कुटखेडा ता. बयाना जि. भरतपूर, राजस्थान) यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील काही आरोपींना शिक्रापुर पोलिसांनी जेरबंद केले.

मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश जगताप चार महिने उलटून देखील फरार होता. अनेकदा तो राजकीय नेत्यांच्या सानिध्यात गेल्याबाबतचे काही फोटो देखील प्रसारित झाले झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यामुळे महेश जगतापला अटक करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना आज सायंकाळच्या सुमारास महेश जगताप पिंपळे जगताप येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस नाईक शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, जयदीप देवकर, विकास पाटील, लखन शिरसकर, निखील रावडे यांनी साध्या वेशात पिंपळे जगताप येथे सापळा रचला असता त्यांना महेश जगताप आल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी शिताफीने महेश जगताप (रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) याला ताब्यात घेत जेरबंद केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे करत आहे.