बिजमाता राहिबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह सामाजिक संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर प्रदान 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ परसबाग लावली गेली पाहिजे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर देशी बियाणे पोहोचले पाहिजे आणि त्याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तरच आपल जेवणाच ताट विषमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सेंद्रिय शेती , जैविक शेती करण्यासाठी बिज संवर्धन करणे गरजेचे असुन भारतात सर्व प्रकारची पिके घेतली जातात. त्यामुळे विषमुक्त शेतीसाठी सर्वांनी आग्रही राहावे. तसेच रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बिजमाता पदमश्री राहिबाई पिपोरे यांनी केले.

हिलिंग लाईव्ह या सामाजिक संस्थेतर्फे पद्मश्री,बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या पारंपारिक देशी बीज संवर्धनासाठी एक हातभार म्हणून त्यांना ट्रॅक्टर भेट देण्यात आला. रांजणगाव महागणपती मंदिर प्रवेशद्वाराजवळ हा सोहळा शनिवार (दि 28) रोजी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कोल्हापुरच्या श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती, हिवरे बाजार गावचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, कै सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता ताई सपकाळ, हिलींग लाईव्ह संस्था संस्थापक जानी विश्वनाथन या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा ट्रॅक्टर वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी आलेल्या सर्वच मान्यवरांनी हस्ते प्रथम श्री महागणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य विश्वस्त ओंकार देव, सचिव तुषार पाचुंदकर पाटील तसेच रांजणगाव गणपतीच्या पोलिस पाटील सारीका पाचुंदकर यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, छञपती शिवाजी महाराजांनी शेतीला समोर ठेवून स्वराज्याची निर्मिती केली. तापमान बदलाच शेतीवर मोठा परिमाण होत असुन बियाणे व शेती दुषित झाली. भारतात पंजाब ही कँन्सर ची राजधानी बनली आहे. कोरोना नंतर आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागले असल्याने देशी वाण संवर्धनासाठी आपल्याला झगडावे लागेल. राहिबाई पिपोरेंनी जतन केलेले देशी बियाणे हे येणाऱ्या पिढ्यांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत असेही पवार यांनी सांगितले.

तर पर्यावरण , शेती व आरोग्य याची सांगड घालून आपण आपल जीवन जगले पाहिजे. कारण रासायनिक खतांचे परिणाम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेतीचे आगार असलेले आगार पंजाब कँन्सर चे आगार बनले आहे. कारण हरीत क्रांतीचे परिणाम आपल्याला भोगायला लागले आहेत. जुने देशी वाण बाजुला करुन नवनवीन वाण विकसित होऊन आपण ते खाऊ लागलो माञ या मुळे आपण आजाराला निमंत्रण दिले असुन महाराष्ट्रात ही कँन्सर ट्रेन यायची वाट पाहायची आहे का…? असा सवाल श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे भोसले यांनी केला.

यावेळी रांजणगाव देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओंकार देव , सचिव तुषार पाचुंदकर, हिलींग लाईव्ह महाराष्ट्र प्रमुख संतोष सांबारे , निमगाव भोगीच्या सरपंच सुप्रिया पावसे , राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताञय पाचुंदकर , पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे , पोलीस पाटील सारिका पाचुंदकर, प्रा माणिकराव खेडकर, नारायणी फंड, हिलींग लाईव्हचे संतोष शेवाळे, स्वप्नील फलके, सुनील पडवळ, विवेकानंद फंड, उषाताई वाखारे, विवेकानंद बढे, राजेश गायकवाड यांसह विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी , निमगाव भोगी व रांजणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन अर्चना भोर, श्रावणी फंड यांनी केले. तर आभार विवेकानंद फंड यांनी व्यक्त केले.