शिरुर तालुक्यात महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी दवाखान्यात ध्वजारोहन न केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) आज (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रत्येक सरकारी कार्यालयात भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात येतो. परंतु शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र येथील कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहन केले नसल्याची बाब समोर आली असुन या निष्काळजीपणा बाबत येथील वैद्यकीय अधिकारी मंजुषा सातपुते तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काही जागरुक नागरीकांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणुन साजरा केला जातो. यादिवशी सगळ्या सरकारी कार्यालयात तिरंगा ध्वज फडकविला जातो. परंतु मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे पाच ते सहा महिन्यापुर्वी उदघाटन झाले होते. त्यामुळे नवीन इमारत असतानाही येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यालयात ध्वजारोहण का केलं नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा सातपुते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ध्वजारोहन करण्यासाठी उभारण्यात आलेला ध्वजस्तंभ हा जास्त उंच असुन जास्त जास्त वारा सुटल्यानंतर दोन ते तीन वेळा त्याचा “कडकड” असा आवाज आला. त्यामुळे ध्वज फडकविताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन आम्ही ध्वज फडकविला नसल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (दि 1) मे रोजी महाराष्ट्र दिन असतानाही येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले नसल्याची तक्रार काही जागरुक नागरिकांनी माझ्याकडे केली असुन ही बाब गंभीर आहे. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावणार असुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.