कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जनतेच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याबद्दल शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी निवेदनाद्वारे पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील बापूसाहेब काळे यांनी अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनानुसार निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत व शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही निवेदन देऊन अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी २०२१ मध्ये निमगाव म्हाळुंगी येथील रस्त्यावर अतिक्रमण झालेले असल्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात होऊन अपघातात एका व्यक्तीचा मृत्य झाला होता. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्याने निमगाव म्हाळुंगी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्या खाली असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामध्ये प्रजिमा, ग्रामा, इजीमा तसेच इतर प्रमुख मार्ग असून निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीने २९ डिसेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत ठरावासह अतिक्रमणाबाबत अहवाल सादर केला होता.

त्यानंतर त्याच संदर्भातील पत्र २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. तरी देखील अद्याप कारवाई झालेली नसल्याने पुन्हा संबंधित विभागाला निवेदन देऊन अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी करत कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील

शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे यांनी निवेदन देत केली आहे.