रांजणगाव MIDC पोलिसांची शेळी-बोकड चोरीप्रकरणी धडक कारवाई; दोन जणांना अटक करत १.१५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये शेळी आणि बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभुमीवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करत अवघ्या ७२ तासांत दोन सराईत चोरट्यांना अटक करुन मोठी कामगिरी बजावली आहे.

बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे परीसरात काहीजण दुचाकीवर फिरुन पाळत ठेऊन शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकडांची चोरी करत असल्याच्या तक्रारी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला आल्या होत्या. याबाबत माणिक रामभाऊ काळे (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा बोकड चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नेमणुक करण्यात आली.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ , योगेश गुंड, किशोर शिवणकर आदींनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरु केला.

या तपासादरम्यान गणेश कैलास ब्राम्हणे (वय २१) तसेच सुनील आण्णाभाऊ माळी (वय २४, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना श्रीगोंदा तालुक्यातुन अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी बाभुळसर खुर्द, करंजावणे, वाघाळे , गणेगाव खालसा तसेच शिरुर तालुका परिसरातून शेळी-बोकड चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ५ बोकड आणि १ शेळी व चोरीसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शेळी-बोकड शेतकऱ्यांना परत देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितीन भोस, संदीप जगदाळे, रामेश्वर वाहेकर यांनी केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार नितीन भोस, संदीप जगदाळे आणि नितेश हुडे हे करत असुन आरोपींकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक

रांजणगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा वायदंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश 

रांजणगाव गणपती येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश