RANJANGAON

शिरुर तालुक्यात पोलिसांकडून चायनीज व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

मुख्य बातम्या

पुणे: कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात चायनीजचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीस रात्रीच्या गस्तीस असणाऱ्या रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत सदर व्यक्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन देऊन या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ही घटना सोमवार (दि. ८) ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या दरम्यान घडली असून याबाबत गौतम छगन शिंदे यांनी तक्रार अर्ज केला आहे.

गौतम शिंदे यांचे गाव श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर असून ते गेल्या दोन वर्षांपासून यश इन चौक येथे चायनीजचा व्यवसाय करतात. ८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता शिंदे व त्यांचा परप्रांतीय कामगार चायनीज सेंटर बंद करुन जेवण बनवत होते. त्यावेळेस रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे वाहन चालक पांडुरंग साबळे हे त्याठिकाणी आले व त्यांनी त्या परप्रांतीय कामगाराला शिवीगाळ करत गाडीत बसण्यास सांगितले. परंतु त्या कामगाराला मराठी कळत नसल्याने त्याने गौतम शिंदे यांना बाहेर बोलावले. त्यानंतर साबळे यांनी शिंदे यांना शिवीगाळ करत गाडीत बसवले आणि पोलीस स्टेशनला नेले.

त्यानंतर साबळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार अमित चव्हाण आणि पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर यांच्या ताब्यात शिंदे यांना दिले. तिथे अजून एका चायनीज व्यावसायिकालाही आणले होते. त्यानंतर या दोघा व्यावसायिकांना वरील दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर शिंदे यांनी सदर कर्मचाऱ्यांना माझी काहीच चूक नाही, चायनीज सेंटर मध्ये एकही ग्राहक नव्हता वाटल्यास तुम्ही CCTV कॅमेरे तपासा अशी विनंती केली, त्यावेळी रघुनाथ हळनोर यांनी काहीही ऐकून न घेता शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच या दोघांनाही पैशाची मागणी केली.

त्यानंतर शिंदे यांनी माझी पत्नी वर्षांपूर्वी कोरोनामुळे मयत झाली असून तिच्या आजारपणात खूप पैसे खर्च झाले त्यामुळे मी आधीच कर्जबाजारी असून सध्या श्रवण महिना चालू असल्याने चायनीजचा धंदाही होत नाही त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत. मला घरी जाणे गरजेचे असून माझा लहान मुलगा व वडील घरी एकटेच आहेत. त्यामुळे कृपया मला घरी जाऊद्या, अशी पोलिसांना विनंती केली. परंतु पोलिसांनी शिंदे यांचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी एका मित्राला फोन करुन पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांना सोडून दिले.

या सर्व प्रकारामुळे गौतम छगन शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक तसेच रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन हा सर्व प्रकार कथन केला असून या लाचखोर, निर्दयी आणि जातीभेद करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मुंबई येथे मंत्रालयासमोर संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यावर नक्की काय निर्णय घेणार ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.