सणसवाडी व वढू बुद्रुक मध्ये वीज चोरांवर गुन्हे दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे वीजबिल थकबाकी असल्याने विद्युत वितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित केलेला असताना देखील चोरुन वीज वापरणाऱ्यांना कारवाई करत विद्युत केबल जप्त करुन दत्तात्रय रामभाऊ ढमढेरे व पंडित केशव वाजे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक येथे खंडित वीज पुरवठ्याबाबत पाहणी करण्यासाठी विद्युत वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता बसवराज शरणप्पा बिराजदार, वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर आहेरकर, मंगेश भंडारी, सीताराम राठोड हे गेलेले असताना सणसवाडी येथे २०२० मध्ये वीजबिल थकल्याने विद्युत वितरण विभागाने दत्तात्रय ढमढेरे यांचा पुरवठा खंडित केलेला असताना देखील त्यांनी विजेच्या पोलवरून केबल टाकून चोरून वीज वापरल्याचे निदर्शनास आले.

तसेच सदर पथकाने वढू बुद्रुक येथे जात पंडित वाजे यांचा वीज पुरवठा वीज बिल थकल्याने २०२१ मध्ये खंडित केलेला असल्याने सदर ठिकाणी देखील पाहणी केली असता वाजे यांनी विद्युत पोलवर केबल टाकून चोरून वीज वापरल्याचे निदर्शनास आले, यावेळी विद्युत वितरणच्या पथकाने दत्तात्रय ढमढेरे व पंडित वाजे यांच्या येथील विद्युत केबल जप्त केल्या.

याबाबत विद्युत वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता बसवराज शरणप्पा बिराजदार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दत्तात्रय रामभाऊ ढमढेरे रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व पंडित केशव वाजे रा. वढू बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार व पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहे.