शिरुर; शिंगाडवाडी शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

वाघाळे (तेजस फडके): जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन शिंगाडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्तीच्या वातावरणात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, देशभक्तीपर गीते व कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

या वेळी विद्यार्थ्यांकडून संविधान वाचन करण्यात आले. तसेच गावाला असाक्षर मुक्त गाव बनविण्याची सामूहिक शपथ उपस्थित ग्रामस्थांनी घेतली. या उपक्रमातून संविधानाचे महत्त्व आणि शिक्षणाचे मूल्य अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दादाभाऊ शिंगाडे आणि उपाध्यक्ष अजय म्हस्कु शिंदे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.या कार्यक्रमासाठी गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, तरुण मंडळ, महिला मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देशसेवेचे व शिक्षणाचे महत्त्व सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे शिंगाडवाडी गावात देशभक्तीची भावना अधिक बळकट झाली असून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.