शिरुर; नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक आजोबांनी ‘त्या’ कार्यकर्त्याला सुनावले…

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) सध्या कडक उन्हाळा चालु असुन उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतं असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातही राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. त्यामुळे नेत्यांबरोबर कार्यकर्तेसुद्धा पायाला भिंगरी लाऊन आपल्या नेत्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. परंतु एका लग्नात आपल्या नेत्याच्या वतीने आणि नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याच्या वतीने लग्नात शुभेच्छा दिल्याने एका राजकीय कार्यकर्त्याची निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या आजोबांनी चांगलीच कानउघडणी केल्याची सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.

 

उन्हाळा म्हणलं की लगीन सराई आणि लगीन सराई म्हणलं की लग्नात शुभेच्छा देण्यासाठी वर आणि वधु पक्षाकडुन मोठमोठ्या नेत्यांना आणि विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांना आमंत्रण दिली जातात. ज्यांना शक्य असतं ते उपस्थित राहतात आणि शुभेच्छा देतात. परंतु सध्या शिरुर-आंबेगाव तालुक्यात काही पुढारी मंडळी त्यांचे ‘बिग बॉस’ उपस्थित नसतानाही उगीचच त्यांच्या वतीने शुभेच्छा देत असतात. अनेकवेळा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला हे पटत नाही. परंतु ते चांगल्या कार्यक्रमात गोंधळ नको म्हणून ते निमुटपणे सहन करतात.

 

नुकताच असाच एक किस्सा पाठीमागच्या आठवड्यात शिरुर तालुक्यात घडला‌. त्याच झालं असं मयुरी लाॅन्स, करंदी चौफुला येथे एक लग्नसोहळा पार पडत होता. एका पक्षाच्या अध्यक्षांनी नववधुवरांना शुभेच्छा देताना नेहमीप्रमाणे आपल्या नेत्यांच्या नावाने तसेच आपल्या सगळ्यांच्या नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. पण कहर तर तेव्हा झाला. जेव्हा त्यांनी आपल्या नेत्याच्या गेली अनेक वर्षे कट्टर विरोधक असलेल्या परंतु सध्या एकाच पक्षात असलेल्या नेत्याच्या नावाने शुभेच्छा दिल्या.

 

हे मात्र काही निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या नवरीच्या आजोबांच्या मनाला पटलं नाही. मग काय स्टेजवरच गोंधळ चालु झाला. ‘आम्ही अमुक अमुक नेत्याला निमंत्रण दिलेल नाही. तो नेता इथं उपस्थितही नसताना तुम्ही त्यांच नाव घेतलंच कसं, तुम्ही तुमच्यापुरत्या शुभेच्छा द्या, बाकीच्यांचा ठेका घेऊ नका असा त्या आजोबांनी सुर लावत त्या कार्यकर्त्याची चांगलीच ‘कानउघडणी’ केली. विशेष म्हणजे व्यासपीठावरच मोठ्या आवाजात हा गोंधळ चालु असल्याने त्या ‘अध्यक्षां’ चा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.

 

यावेळी खाली उपस्थित वऱ्हाडी मंडळींची अगदी छान करमणूक झाली. दिलखुलासपणे हसत त्यांनी आजोबांना साथ दिली. या सर्व प्रकाराने गोंधळ उडाल्यामुळे हे पक्षाचे अध्यक्ष जेव्हा लग्न सोडून जायला निघाले तेव्हा टाळ्या वाजवून लोकांनी आजोबांचेच म्हणणे योग्य असल्याचा निर्वाळाही दिला. या प्रकाराची शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु असुन निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या आजोबांनी केलेल्या कृतीच सगळीकडे समर्थन करण्यात येतंय.