Shirur Police

शिरुर पोलिसांनी खून करुन पळालेल्या आरोपीस ४८ तासात केली अटक…

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील डोंगरगण गावच्या हद्दीतील हॉटेल रानवारा येथे महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५) या हॉटेल कामगाराचा 8 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री दरम्यान त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंता रघुनाथ कांबळे या कामगाराने खून करुन पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने हालचाल करत या आरोपीस ४८ तासात अटक केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५ रा.दावतपुर, ता. औसा, जि. लातूर) तसेच अनंता रघुनाथ कांबळे (ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी) हे दोघेही वडनेर येथील हॉटेल रानवारा येथे एकत्र काम करत होते. 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात कारणावरुन अनंता कांबळे याने धारदार शस्त्राने सुनिल सरोदे डोक्यात, पायावर तसेच गुप्तांगावर वार करुन कुरपणे खून केला होता. याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे 8 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अनंता रघुनाथ कांबळे अतिशय क्रूरपणे खुन करुन तो घटनास्थळावरुन गुन्हयात वापरलेले हत्यार घेवून पळून गेला होता. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करणे हे पोलिसांपुढे आव्हान होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ टाकळी हाजी चौकीतील अधिकारी आणि कर्मचारी यांची वेगवेगळे पथके तयार केली. आरोपीच्या मुळगावी रत्नागिरी तसेच पुणे शहर व आजुबाजुच्या परीसरात त्याचा गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक पध्दतीने शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर पोलिस निरीक्षक राऊत यांना खबऱ्या मार्फत गुन्हयातील आरोपी अनंता रघुनाथ कांबळे हा विरार (जि. ठाणे) या परिसरात लपुन बसल्याची माहिती मिळाली. त्याच अनुषंगाने डी.बी.पथकाकडील पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार तसेच पोलिस अंमलदार प्रविण पिठले हे तातडीने विरार येथे रवाना झाले. तसेच त्यांनी पाच तास आरोपीचा विरार रेल्वे स्टेशन येथे शोध घेत शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे अपर पोलिस अधीक्षक मितेश घटट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, डी.बी. पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहायक फौजदार नाजिम पठाण, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, नाथसाहेब जगताप, पोलिस अंमलदार प्रविण पिठले, विशाल पालवे, संतोष साळुंके, दिपक पवार, सुरेश नागलोत, पोलिसमित्र दिपक बढे यांनी केली असुन. या गुन्हयाचा पुढील तपास अमोल पन्हाळकर हे करत आहेत. या अटक केलेल्या आरोपीस आज (बुधवार) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीस (ता. 16) ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिलेली आहे.