rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

मुख्य बातम्या

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू पीत असल्याने वाद होत होते. मंगळवारी (ता. २) सचिन याच्या आजोबांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम होता. मात्र, सचिन त्या कार्यक्रमाला न थांबता रानातील पोल्ट्रीवर थांबला होता. त्याने पत्नी रुपाली हिला देखील तेथे बोलावून घेतले होते. रात्री उशिरा रुपाली पती सचिनकडे पोल्ट्रीवर गेली असता त्यांच्या मध्ये वाद झाले. आज पहाटेच्या सुमारास रुपाली हिला शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटल येथे आणले असता तिच्या डोक्यात तसेच गळ्यावर काही जखमा होत्या तर रुपाली हि मयत झालेली होती.

याबाबत रुपालीच्या नातेवाईकांनी सचिन यास विचारपूस केली असता त्याने रात्री आमच्यात वाद झाल्याने मी रुपाली हिला मारले असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. सदर घटनेमध्ये रुपाली सचिन खंडाळे (वय ३४ वर्षे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रुपालीचा भाऊ ललित दत्तात्रय गावडे (वय २६ वर्षे रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहेत. शिक्रापूर पोलिसांनी सचिन दत्तात्रय खंडाळे (रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.