शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली.
गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी शिरूर शहरात राहतात, त्यामुळे गावातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी दरवेळी धावपळ करावी लागत होती. या अन्यायाविरोधात परिसरातील ९ गावांच्या ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पहिल्यांदा आलेल्या चौकशी समितीने नागरिकांचे म्हणणे न घेता केवळ अधिकारी व त्यांच्या निकटवर्तीयांकडून जबाब घेत खोटा अहवाल तयार केला. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनीच “वरिष्ठांच्या दबावामुळे खोटा अहवाल सादर करावा लागला” असे मान्य केल्याचे समोर आले. दुसऱ्या वेळेस पुन्हा तीच समिती दाखल झाल्याने ग्रामस्थांनी तिचा जोरदार विरोध करत तिला माघारी पाठवले.
अखेर तिसऱ्यांदा दि.३ रोजी चौकशी समिती टाकळी हाजी येथे दाखल झाली. यावेळी सरपंच अरुणाताई घोडे, नितीन पिंगळे व ग्रामस्थांनी ठोस पुरावे समितीसमोर सादर केले. वैद्यकीय अधिकारी केंद्रात राहत नसल्याचे वस्तुनिष्ठ दाखले तसेच गोळ्या–औषधांच्या नोंदीत झालेल्या मोठ्या गडबडी समितीच्या लक्षात आणून दिल्या. तेथील काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दबावामुळे सुरुवातीला चुकीचे जबाब दिले होते; परंतु समितीने स्पष्ट इशारा दिला की “चुकीचे जबाब दिल्यास तुमच्यावर थेट कारवाई होईल.” त्यानंतर त्यांचे नव्याने जबाब नोंदवण्यात आले.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आता समिती निपक्षपातीपणे अहवाल देणार का? की पुन्हा उच्चाधिकार्यांच्या दबावाखाली अधिकाऱ्याला वाचवले जाणार?” याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.जर वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली नाही आणि खोटा अहवाल तयार करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी व माधवी शिंदे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर नागरिकांनी सोमवार दि. ६ पासून मोठ्या संख्येने उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
“आम्ही अनेकदा अर्ज, तक्रारी, मागण्या केल्या; पण प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांचे संगनमत उघड झाले. यावेळी जर पुन्हा न्याय न मिळाला, तर टाकळी हाजी व परिसरातील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.आता प्रश्न असा की समिती खरी परिस्थिती दाखवणारा निष्पक्ष अहवाल सादर करेल का? की ‘बड्या कलेक्टरच्या दबावामुळे’ पुन्हा एकदा वैद्यकीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.